- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतून 'आऊटगोईंग' केल्याचा मोठा फटका ज्या नेत्यांना बसला, त्यात आता चित्रा वाघ यांचे नावही ठळकपणे घेतले जाऊ लागले आहे. जी भीती दाखवून त्यांना तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ज्या पक्षातून बाहेर काढले, त्याच पक्षाकडे गृह विभागाची धुरा असताना त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची नामुष्की त्यांना सहन करावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
किशोर वाघ यांना साडेचार वर्षांपूर्वी एसीबीने अटक केली तेव्हा आणि आता बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला. यावेळीही चित्रा वाघ या विरोधीपक्षात आहेत. मात्र तेव्हाच्या व आताच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची झालेली अदलाबदल त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरल्याचे सांगितले जात आहे.मागील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात महिलाप्रदेशाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांचाही समावेश होता. त्या पक्षांतरात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार प्रसाद लाडयांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार यांनी भाजपच्या सरकारकडून पतीवरील एसीबीच्या कारवाई टाळण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे चित्रा वाघ यांनी आपल्याला सांगितल्याचे स्पष्ट केले होते.
पूर्वाश्रमीच्यापक्षावर टीका विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या चाणक्यनीतीमुळे अभूतपूर्व राजकीय नाट्य घडून महाविकास आघाडी सत्तेत आली आणि सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला विरोधात बसावे लागले. त्यामुळे चित्रा वाघ यांनाही विरोधात राहावे लागले. ५ जुलै २०१६ रोजी चार लाखांची लाच घेतल्याप्रकरणी किशोर वाघ यांना अटक करण्यात आली, तेव्हा चित्रा वाघ यांनी राजकीय सूडबुद्धीने पतीवर कारवाई केल्याचा आरोप केला होता. साडेचार वर्षांनंतर त्यांच्या पतीवर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांची तीच प्रतिक्रिया आहे. मात्र त्यावेळी ज्या पक्षावर त्या तोफ डागत होत्या, आज त्याच पक्षाच्या व्यासपीठावरून त्या आपल्या पूर्वाश्रमीच्या पक्षावर टीका करीत आहेत.