ठाणे: पैशाच्या वादातून रोहीत सिंग (३७, रा. मुंबई फिरस्ता) या भंगारातील बाटली विक्रेत्या मित्रचा खून करणार्या विलास सुरवसे (३२, रा. खरडी गाव, दिवा, ठाणे) आणि शांताराम चव्हाण (४३, रा. दिवा) या दोघांना अटक केल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. जी. खडकीकर यांनी मंगळवारी दिली. या दोन्ही आरोपींना आता मुंब्रा रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्त्यावर प्लास्टीकच्या बाटल्या गोळा करणारा रोहित हा ३० जानेवारी २०२२ रोजी दिवा रेल्वे स्थानकातील ब्रिजखाली गंभीर जखमी अवस्थेत ठाणे रेल्वे पोलिसांना मिळाला होता. त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ओळखीतल्याच दोघांनी चॉपरने डोक्यावर आणि हातावर मारहाण करुन वार केल्याची माहिती त्याने उपचारादरम्यान डॉक्टरांना दिली होती. दरम्यान, चॉपरचा वर्मी घाव लागल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी अभिप्राय दिला.त्याअनुषंगाने मुंबई लोहमार्गचे उपायुक्त मनोज पाटील, सहायक आयुक्त देविदास सोनवणो आणि ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल, अविनाश आंधळे आणि सहायक पेालीस निरीक्षक रामेश्वरी पांढरे आदींच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केला. रोहित हा ३० जानेवारी रोजी दिवा गावातील गावदेवी मंदीराजवळ एका दारूच्या गुत्त्यावर त्याच्या दोन मित्रंसोबत दारु पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता.
याच वादातून त्या दोघांनी चॉपरने त्याच्यावर वार करुन जबर मारहाण केली. याच मारहाणीमध्ये नंतर त्याचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी सुरुवातीला रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता. संबंधित घटनास्थळी रेल्वे पोलीसांनी कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर सुरवसे आणि चव्हाण अशी त्या दोन मित्रंाची नावे समोर आली. खब:यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या दोघांनाही मुंब्रा आणि दिवा येथून ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी या खूनाची कबूलीही दिली. नंतर यात खूनाचा गुन्हा दाखल करुन दोघांनाही मुंब्रा पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.