वाडा : वाडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष मनोरे यांच्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा हल्ला चोरीच्या उद्देश्याने की अन्य कारणाने झाला, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, व्यापारी संघटनेने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडा शहरातील आगरआळी हे ठिकाण पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष मनोरे हे तेथे राहतात. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा अज्ञात इसमाने वाजवला. त्यानंतर आशिष यांनी झोपेतून उठून दरवाजा उघडला. दरवाजा उघडून आजूबाजूला त्यांनी पाहिले असता त्यांना तिथे कोणी दिसले नाही. त्यानंतर ते अधिक पुढे आले असता एक इसम त्यांना दिसला. त्यांनी त्याला आवाज दिल्यानंतर या दोघांत झटापट झाली. त्याचक्षणी हल्लेखोराने त्यांच्या पोटात चाॅपर घुसवून तो पळून गेला. त्यानंतर त्यांना तत्काळ वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
डाॅक्टरांनी त्यांना पुढे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना डाॅ. वैभव गंधे यांच्या रुग्णालयात नेले असता पोटातच चाॅपर असल्याने त्यांनी ठाणे येथे जाण्यास सांगितले. ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात नेल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली. दरम्यान, हा हल्ला चोरीच्या उद्देश्याने की अन्य कारणाने झाला याचा तपास पोलीस करीत आहेत. याबाबत अनोळखी मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.