मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक असलेला फारुख देवडीवाला याची छोटा शकीलने पाकिस्तानात हत्या केली. फारुखने दाऊदच्या विरोधात कट रचल्याचा शकीलला संशय होता. त्यातूनच त्याचा कराचीत काटा काढण्यात आला असल्याची चर्चा सुरु आहे. डी गँगच्या फारुख हा दुसरा हस्तक आहे ज्याची हत्या कराचीत करण्यात आली आहे. याआधी २००० साली डी गँगच्या फिरोझ कोकणीची पाकिस्तानात अशीच हत्या करण्यात आली होती.
मूळ जोगेश्वरीचा असलेला देवडीवाला हा इंडीयन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी संघटनेत सक्रिय असल्याने दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) रडारवर होता. गेल्या वर्षी फारुखला दुबईत अटक करण्यात आली होती. गुजरातचे गृह मंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येमागे आणि आयएमसाठी भरती करणे व इतर गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश असल्याने त्याचा ताबा भारताला पाहिजे होता. मात्र, त्याला भारतात आणण्यात अपयश मिळालं होतं. पाकिस्तानने 2018 जुलैला बनावट पासपोर्ट व इतर कागदपत्र बाळगल्याप्रकरणी देवडीवालाला अटक केली होती. त्याने दुबईतील वास्तव्यावेळी भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन दाऊदच्या विरोधात कटकारस्थान रचले होते, अशी माहिती छोटा शकीलला मिळाली होती. तेव्हापासून शकीलच्या रडारवर फारुख देवडीवाला होता. त्यातून महत्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर देवडीवालावर विश्वास ठेवणे दाऊदला कठिण वाटले. त्यातूनच कराचीत त्याची हत्या करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने याबाबत मौन बाळगले आहे.