नालासोपारा : दामदुप्पट परताव्याचे प्रलाेभन दाखवून काेट्यवधींची फसवणूक करणाऱ्या ४० वर्षीय आराेपीचे रविवारी अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली असून शरीराला सिगारेटचे चटके, विजेचा शाॅक देउन त्याच्याशी अश्लील चाळे केल्याचा अमानुष प्रकार नालासाेपारा येथे झाला आहे. मात्र, याप्रकरणी नालासाेपारा पाेलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. अत्याचार झाले असतील तर चाैकशी करून कारवाई करण्यात येईल, असे पाेलिसांनी सांगितले.
गुजरातच्या गांधीनगर येथे राहणारा विशाल बारोट हा लॉकडाऊनच्या काळात नालासोपारा पश्चिमेकडील जय हेरिटेज इमारतीत राहत होता. त्याने दामदुप्पट गुंतवणूक परतावा देण्याचे प्रलाेभन दाखवून लाेकांची फसवणूक केली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने लोकांना मदतही केली. त्यामुळे अनेक जणांनी रांगा लावून दामदुप्पट पैसे मिळणार म्हणून लाखाे रुपये भरले. या आरोपीने अंदाजे ३० काेटींचा घोटाळा केला असल्याचे समजते. सोमवारी रात्री नालासोपारा पोलिसांनी या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तत्पूर्वी रविवारी या आराेपीचे काहींनी कारमधून अपहरण करून त्याच्याशी हा अमानुष प्रकार केला. त्यानंतर त्याला इमारतीत आणून सोडले. हे आराेपी पुन्हा त्याला नेण्यासाठी आले असता फसवणूक झालेल्या इतर महिलांनी गाेंधळ घालून त्याला नेण्यास विराेध केला. त्यामुळे हे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून मारहाण करणाऱ्या आरोपींनी एका महिलेला पुढे करून पाेलिसांत गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी, फसवणूक झालेल्या महिलांनी केलेली तक्रार घेण्यास पाेलीस टाळाटाळ करत हाेते. आता झालेल्या या कृत्याबाबतही पाेलीस तक्रार घेत नसल्याचे या महिलांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
आरोपीने पैसे दामदुप्पट करून देण्याचे प्रलाेभन दाखवून शेकडो लोकांची काेट्यवधींची फसवणूक केली आहे. याबाबत सोमवारी रात्री गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या आरोपीसाेबत काही अमानुष प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करून त्यावर कारवाइ करण्यात येईल. - वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे