नागपूर - मुंबईत चोरी करून १३ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या आणि रेल्वेने नागपूरकडे पळून जात असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) धावत्या ट्रेनमध्ये सिनेस्टाईल अटक केली. दीपक बिनोद नायक (वय ४४) असे त्याचे नाव आहे.
मुळचा बालेश्वर (ओडिशा) जिल्ह्यातील देऊला भोगराई येथील रहिवासी असलेल्या दीपकने सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडसी चोरी करून रोख आणि दागिन्यांसह १३ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केल्यानंतर आरोपी दीपक गितांजली एक्सप्रेसने नागपूरकडे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सांताक्रूझ पोलिसांनी नागपूर आरपीएफला ही माहिती कळविली. त्यावरून आरपीएफचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांनी आपल्या सहकाऱ्यांना आरोपीबाबत माहिती देऊन आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, शेगांव, अकोला, बडनेरा आणि वर्धा आरपीएफच्या निरीक्षक आरोपीचा शोध घेऊ लागले. सहायक सुरक्षा आयुक्त कोटा यांच्या नेतृत्वात नागपूर निरीक्षक आर. एल. मिना, एन. पी. सिंह, आर. एस. मिना, उपनिरीक्षक सुभाष मडावी, देवेंद्र पाटील, मदनलाल, रामनिवास मिना, सेवाग्रामचे ए. के.शर्मा, मंगेश दुधाने, मुस्ताक, मुकेश राठोड, जसवीर सिंह यांनी गितांजली एक्सप्रेसमध्ये शोध घेतला असता आरोपी एस ६ नंबरच्या कोचमध्ये बसून दिसला. त्याच्या मुसक्या बांधून पोलिसांनी रविवारी त्याला नागपूर स्थानकावर उतरवले.
झडतीत आढळले नोटांचे बंडलआरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ नोटांचे बंडल आढळले. पोलिसांनी त्याच्याकडून ४, ११, ३७० रुपये रोख, ९१ हजारांचे मंगळसूत्र, मोबाईल, घड्याळ आणि ईतर चिजवस्तू जप्त केल्या. ही माहिती सांताक्रूझ पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार, सांताक्रूझ पोलिसांचे पथक नागपुरात पोहचले.
मुंबई पोलिसांनी घेतला आरोपीचा ताबावरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपी दीपक नायकचा ताबा घेतला. त्याच्याकडून रोख आणि दागिन्यांचा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला.