जशपूर - छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील एका 8 वर्षीय हिंदू मुलाची खतना (सुन्नत) केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचे वृत्त पसरताच हिंदुत्ववादी संघटनांनी गोंधळ घालायला सुरूवात केली आहे. अखिल भारतीय जनजाती सुरक्षा मंचच्या अध्यक्षांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. त्यानंतर, मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी आपल्या सासरच्यांना जबाबदार धरत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुलाची आई, आजी यांसह तिघांना अटकही केली आहे. सन्ना पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, जशपूर जिल्ह्यातील गाव नगरटोली सन्नानिवासी एका व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी एका मुस्लीम युवतीशी विवाह केला होता. या दोघांचे दोन मुलं आहेत. त्यामध्ये एक मुलगा 8 वर्षांचा आणि लहान मुलगी 6 वर्षांची आहे. आपल्या मुलाची खतना (सुन्नत) केल्याचे संबंधित पित्याला माहितीही नव्हते. मात्र, नुकतेच याबाबत मुलाच्या वडिलांना माहिती मिळताच, त्यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी नोंदणी क्र 0/2022 कलम 295 (क), 323, 34 भादवि आणि छग धर्म स्वातंत्रता अधिनियम चे कलम 3,4 अनुसार गुन्हा दाखल केला आहे. सन्ना पोलीस ठाण्याचे प्रभारी भरतलाल साहू यांनी म्हटले की, दिड महिन्यांपूर्वी प्रार्थीचा मुलगा आपल्या आईसमवेत ननिहाल येथे गेला होता. त्याचवेळी, मुलाची खतना करण्यात आली. मात्र, याबाबत मुलाच्या वडिलांना पुसटीशीही कल्पना देण्यात आली नव्हती. पण, कुटुंबातील सदस्य आणि इतरांना याची माहिती मिळाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी महिला एवं बालकल्याण अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात माहिती दिली आहे.