न्यूयॉर्क : अमेरिकेच्या टेक्सास तुरुंगात ७८ वर्षांचा एक वृद्ध कैदी आहे. मधुमेह, हृदयरोगाने त्रस्त असलेल्या या कैद्याला व्हीलचेअरवरून एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यावे लागते. तरीही त्याच्यावर कडक पहारा असतो. सॅम्युएल लिटल असे त्याचे नाव असून, त्याने अमेरिकेतील १४ राज्यांत ९० महिलांचे खून केले आहेत.
आजवरचा सर्वात खतरनाक सिरिअल किलर म्हणून त्याची ओळख पक्की होणार असे त्याने १५ नोव्हेंबर रोजी पोलिसांना दिलेल्या जबानीतून दिसू लागले आहे. आजवर केलेल्या सर्वच गुन्ह्यांची कबुली त्याने नुकतीच पोलिसांना दिली. त्यातील अनेक गुन्हे कधीच उघडकीस आले नव्हते.
अमेरिकेतल्या ओहियो राज्यातील सिनसिनाटी येथे १९७४ साली सॅम्युएलने एका कृष्णवर्णीय महिलेची हत्या केली होती. नंतर १९८४ साली केंटुकीतील गौरवर्णीय महिलेलाही त्याने यमसदनी धाडले. बेघरांसाठीच्या निवारागृहातून पोलिसांनी २०१२ साली त्याला अटक केली होती.पश्चात्तापही नाही१९८० च्या दशकात झालेल्या तीन महिलांच्या हत्येप्रकरणी डीएनएन चाचणीत सॅम्युएलविरोधात पुरावा मिळाला होता. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन त्याला तीन जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो पॅरोलवर सुटणे शक्यच नव्हते. या तीनही महिलांना बेदम मारहाणीसह त्यांच्यावर बलात्कारही केला होता. दारूच्या व्यसनात बुडालेल्या व गरीब घरातील महिलांना तो लक्ष्य करीत असे. आपण केलेल्या गुन्ह्यांबद्दल सॅम्युएलला अजिबात पश्चात्ताप होत नाही.