इन्फाळ विमानतळावर सीआयएफएफ आणि कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका बड्या तस्कराला अटक केली आहे. संबंधित तस्कर तब्बल ९०० ग्रॅम पेक्षाही अधिक सोनं ज्याची जवळपास किंमत ४२ लाख रुपयांच्या आसपास असून ते गुदाशयात लपवून घेऊन जात असल्याचं उघडकीस आलं आहे.
सोन्याची तस्करी करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या हा आरोपी इन्फाळहून दिल्लीला जात होता. त्यानं ९०० ग्रॅमहून अधिक वजनाच्या सोन्याची पेस्ट तयार केली होती आणि ती गुदाशयात लपवली होती. विमानतळावर प्रवाशांच्या होणाऱ्या तपासात सीआयएसएफ आणि कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीबाबत शंका आली. त्यानंतर अधिक तपासणी केली असताना तस्करानं चक्क आपल्या गुदाशयात ९०८.६८ ग्रॅम इतक्या वजनी सोन्याची एकूण चार पाकिटं पेस्ट गुदाशयात लपवून ठेवली होती.
'एक्स-रे' मधून सारं उघडकीस आलंअटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद शरीफ असं असून तो केरळच्या कोझिकोड येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. आरोपी दुपारी २.४० वाजताच्या फ्लाइटनं इन्फाळहून दिल्लीसाठी रवाना होणार होता. अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आरोपीला सुरक्षा चाचणीसाठी थांबवण्यात आलं आणि काही प्रश्नांची त्यानं समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे संशय बळावला. अधिकाऱ्यांनी त्याची मेडिकल तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि शरीराच्या खालच्या भागाचा एक्स-रे काढण्यात आला. यात गुदाशयात गोल्ड पेस्ट लपवल्याचं पाहून सर्वांनाच धक्का बसला. एक्स-रे चाचणीत भांडाफोड झाल्यानंतर आरोपीनं सर्व आरोप मान्य केले.