मीरारोड - भाईंदरच्या डोंगरी पोलीस चौकी जवळ असलेल्या हँग आऊट या हुक्का पार्लर मध्ये तरुण - तरुणींच्या वाढत्या राबत्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीसां कडुन मात्र उच्च न्यायालयाने हरबल हुक्काची परवानगी दिल्याने कारवाई करता येत नसल्याचे म्हटले आहे. पोलीसां कडुन मात्र न्यायालयाच्या आदेशाचा सोयीने वापर करुन हुक्का पार्लरला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हुक्का पार्लरचे बांधकामसुद्धा बेकायदेशीर असून, पालिकेचे अभय असल्याचे ग्रामस्थ म्हणाले.भाईंदरच्या उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेल्या डोंगरी चेक पोस्ट जवळ हँग आऊट या नावाने हुक्का पार्लर तसेच बार चालतोय. या ठिकाणी मध्यरात्री नंतर उशीरा पर्यंत हुक्का पार्लर चालवले जात आहे. उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक एस.डी.निकम यांनी दिलेल्या माहिती नुसार सदर हुक्का पार्लर चालकाने मुंबईतील अन्य हुक्का पार्लर चालकां सोबत मिळून उच्च न्यायालयात याचीका केली होती. त्यांनी हरबल हुक्का असल्याचा दावा करत न्यायालयाकडून परवानगी मिळवली आहे.हरबल हुक्का म्हणून परवानगी असल्याने तसेच वेळेची मर्यादा घालून दिलेली नसल्याने कारवाई करता येत नाही. तरी देखील पोलीस नियमीत जाऊन तपासणी करत असतात असे सांगतानाच निकम यांनी ४ सप्टेंबर रोजी सदर हुक्का पार्लवर कोप्ता कायद्याखाली सॅवियो मॉशीनो फनसेका (३६) , रविकुमार अशोककुमार दुबे (२५) व आशिष रामआचल शर्मा (१९) या तिघां विरोधात गुन्हा दाखल केल्याचे ते म्हणाले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक देवीदास हंडोरे यांनी देखील हरबल हुक्का पार्लर असल्याने कारवाईचा प्रश्न असल्याचे सांगितले.परंतु स्थानिक ग्रामस्थांसह सत्यकाम फौऊंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी मात्र स्थानिक पोलीस आणि महापालिका यांच्या आशिर्वादानेच तरुण पिढीला उध्वस्त करणारा हा हुक्का पार्लर सुरु असल्याचा आरोप केला आहे. सदर हुक्का पार्लचे बांधकाम, शेड , भराव बेकायदेशीर असुन कांदळवनाच्या ५० मीटर आत तसेच सीआरझेड मध्ये असूनही सदर बेकायदा बांधकाम महापालिका तोडत नाही. पोलीस देखील बेकायदेशीर बांधकामा कडे काणाडोळा करतात. बेकायदा बांधकामास वीज पुरवठ्यापासून अन्य परवानग्या मिळाल्याच कशा ? असा सवाल त्यांनी केला आहे.न्यायालयाने देखील हरबल हुक्कासाठी परवानगी दिली असली तरी येथे हुक्कासाठी वापरले जाणारे पदार्थ हरबल असल्याचे प्रमाणपत्र कोणत्या शासकीय संस्थेने दिले आहे? हुक्का पार्लरसाठी वेळेचे बंधन काय आणि किती आहे ? महापालिकेने वा शासनाच्या संबंधित विभागाने परवाना दिला आहे का ? दिला असल्यास कोणत्या अटिशर्ति व निकषा खाली दिला आहे ? असे अनेक सवाल करत पोलीसां कडुन कारवाईला टाळटाळ केली जात असल्याचा आरोप केला आहे. हुक्का पार्लरवर ठोस कारवाई करुन ते बंद केले नाही तर वरिष्ठां कडे दाद मागण्यासह तरुण व ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.
भाईंदरच्या डोंगरी पोलीस चौकी जवळ चालणाऱ्या हुक्का पार्लरविरोधात नागरिकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:04 PM