जळगाव : बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड घेऊन रस्त्याने चालत असलेले धनराज प्रेमराज पुरोहित (६०, रा.शनी पेठ) यांच्या हातातील बॅग मागून दुचाकीने आलेल्या चोरट्याने लांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅग घट्ट पकडून ठेवल्याने चोरटा दुचाकीवरुन खाली पडला अन् त्याचवेळी जमावाने त्याला बेदम चोपून काढले, त्यात तो जागेवरच बेशुध्द पडला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता काव्यरत्नावली चौकाजवळ घडली. राहूल उत्तम चौधरी (वय २५,रा.मांडकी, ता.भडगाव) असे संशयिताचे नाव असून त्याला व पुरोहित या दोघांना पोलिसांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणले तेथून चौधरी याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी पेठेत राहणारे धनराज प्रेमराज पुरोहित यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता ते काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेत व्यवसायासाठी लागणारे दोन लाख रुपये काढायला गेले होते. १ वाजता ही रक्कम काढून बॅगेत ठेवली. त्यानंतर आकाशवाणी चौकाच्या दिशेने ते चालत येत असतानाच जनता बँकेच्या अलीकडे मागून दुचाकीने आलेल्या राहूल चौधरी यांनी ही बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पुरोहित यांनी समयसूचकता दाखवून बॅग घट्ट पकडली, त्यामुळे ते ओढले जावून खाली पडले तर त्यांच्यासोबतच राहूल हा देखील दुचाकीवरुन खाली पडला. यावेळी पुरोहित यांनी चोर...चोर असा अशी आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी पुरोहित यांना सावरत चौधरी याला झोडपून काढले. गर्दीतूनच काही जणांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली, तोपर्यंत चौधरी याला पकडून ठेवण्यात आले.
बेशुध्दावस्थेत आणला पोलीस ठाण्यातजमावाने त्याला इतकी मारहाण केली की तो जागेवरच बेशुध्द पडला. सहायक पोलीस निरीक्षक बिरारी व सहकाऱ्यांनी त्याला पोलीस वाहनात टाकले तर पुरोहित यांनाही पोलीस स्टेशनला आणले. या घटनेत पुरोहित यांच्या पायालाही दुखापत झाली. चौधरी याला पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी स्वत:च जिल्हा रुग्णालयात आणले.