नाशिक : शहरात मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने सोनसाखळी चोरी करणारे दोघे अट्टल सोनसाखळी चोर अखेर गंगापुर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या दाेघांनी मिळून आतापर्यंत पाच दहा नव्हे तर तब्बल ५६ महिलांचे मंगळसुत्र हिसकावल्याचे तपासात निष्पन् झाले. एक चोरटा हा सिव्हिल इंजिनिअर असून त्याने एकट्याने 36 तर साथीदाराच्या मदतीने 26 सोनसाखळ्या आतापर्यंत हिसकावून पोबारा केला होता. त्यांच्या ताब्यातून सुमारे ७१ तोळे सोने व अडीच लाखांची रोकड असा एकुण २९लाख ३२ हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. तसेच चोरीचे दागिणे घेणाऱ्या त्यांच्या ठरलेल्या सराफा व्यावसायिक व दलालांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच नाशिक शहरात पुन्हा सोनसाखळी चोरीची मालिका सुरु झाली होती. शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकापाठोपाठ एक सोनसाखळी चोरीच्या घटना घडत होत्या.. बहुतांश गुन्ह्यांमध्ये केवळ एकटा दुचाकीस्वार हा महिलेच्या समोरुन येऊन सोनसाखळी हिसकावून दुचाकीने भरधाव पसार होत असल्याचे सुगाव्यावरुन स्पष्ट झाले. यानंतर गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रियाज शेख यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ठराविक भागावर लक्ष केंद्रीत केले. गस्तीची पध्दत बदलून साध्या वेशांमध्ये पोलिसांना त्यांच्या खासगी दुचाकींचा वापर करण्याची सुचना केली. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या कामगिरीबद्दल गंगापुर पोलीस ठाण्याच्या पथकाचे सन्मानपत्र व दहा हजारांचे बक्षीस देऊन गौरव केला.
...असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
गंगापुर पोलिसांनी चेन स्नॅचरच्या माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस नाईक मिलिंद परदेशी, शिपाई घनश्याम भोये हे दाेघे साध्या वेशात खासगी दुचाकीने ठराविक संशयास्पद भागात पेट्रोलिंगवर असताना त्यांनी चेनस्नॅचरला हेरले. यावेळी चोरट्याने एका पादचारी वृध्द महिलेची सोनसाखळी हिसकावण्यासाठी ‘यु-टर्न’ घेताच परदेशी व भोये यांनी त्यांच्या दुचाकीने चोरट्याच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी तीघेही खाली कोसळले. दोघांनी तत्काळ त्या चेनस्नॅचरला कमरेच्या दोरीने बांधून अतिरिक्त मदत मागवून चारचाकी वाहनात डांबले.
चोरट्यांसह तीघे सराफ अन् दोन दलाल गजाआड
अट्टल सोनसाखळी चोरी सिव्हिल इंजिनिअर दंगल उर्फ उमेश अशोक पाटील (२७,जय भवानी रोड, नाशिकरोड), तुषार बाळासाहेब ढिकले (३०,रा. आडगाव) या दोघांसह सराफ व्यावसायिक गोपाल विष्णु गुंजाळ (३४, रा. हॅप्पी होम कॉलनी, द्वारका), अशोक पंढरीनाथ वाघ, मुकुंद केदार दयानकर या तीघा सराफांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच संशयित उमेश व तुषार यांचे मित्रवजा दलाल विरेंद्र उर्फ सॅम शशिकांत निकम (३४,रा.सिन्नरफाटा, खर्जुळमळा), मुकुंद गोविंद बागुल यांनाही पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत दिली.