चित्रकूट: उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये एक अजब घटना घडली आहे. बालाजी मंदिरातून लाखो रुपयांचं मूल्य असलेल्या मूर्ती चोरीला गेल्या. आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. चोरीला गेलेल्या मूर्ती माणिकपूरमधील महावीरनगरातील महंतांच्या घराबाहेर सापडल्या आहेत. या मूर्ती महंतांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. मात्र अष्टधातूच्या मूर्ती अद्यापही सापडलेल्या नाहीत.
शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या बालाजी मंदिरातून ९ मे रोजी अष्ट धातू, तांबं आणि पितळ्याच्या १६ मूर्ती चोरीला गेल्या. मंदिराचं कुलूप तोडून चोरांनी अष्टधातूपासून तयार करण्यात आलेल्या श्रीरामाची ५ किलोची मूर्ती, राधाकृष्णाची पितळेची मूर्ती, बालाजी आणि लड्डू गोपालाच्या मूर्तीसह रोख रक्कम आणि चांदीचं सामान लंपास केलं, अशी माहिती मंदिराचे महंत राम बालक दास यांनी दिली. पुजाऱ्याची पत्नी सकाळी मंदिरात साफसफाई करण्यासाठी पोहोचली. त्यावेळी तिला मंदिराचं कुलूप तुटलं असल्याचं आणि मूर्ती चोरीला गेल्याचं लक्षात आलं.
घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. चोरीला गेलेल्या मूर्ती शनिवारी महंतांच्या घराबाहेर आढळून आल्या. महंत राम बालक दास गायींना चारा घालण्यासाठी जात असताना त्यांना एक चिठ्ठी सापडली. मूर्ती चोरी केल्यापासून आम्हाला झोप येत नाहीए. भयानक स्वप्न पडत आहेत. त्यामुळे मूर्ती परत करत आहोत. या मूर्तींची मंदिरात प्रतिष्ठापना करा, असा मजकूर चिठ्ठीत होता.
चिठ्ठी वाचल्यानंतर महंत राम बालक दास यांनी मूर्ती शोधण्यास सुरुवात केली. घराच्या बाहेर असलेल्या टोपलीखाली त्यांना मूर्ती दिसल्या. एका गोणीमध्ये मूर्ती ठेवलेल्या होत्या. पितळ आणि तांब्याच्या १२ मूर्ती त्यांना आढळल्या. मात्र अष्टधातूच्या दोन मूर्ती सापडल्या नाहीत. महंतांनी मूर्ती सापडल्याची माहिती पोलिसांना दिली आणि मूर्ती त्यांना सुपूर्द केल्या.