सोलापूर : सोलापूर-पुणे हायवेवरील बाळे गावाजवळील हॉटेलमध्ये शिरुन ‘आम्ही एसबीचे अधिकारी आहोत असे सांगत’ हॉटेल चालू करण्यासाठी हॉटेलचालकाला खंडणीची मागणी केली. अन्यथा वाईट परिणाम होतील अशी धमकी देण्याची घटना उघडकीस आली. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:५५ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
या प्रकरणी हॉटेलमालक आरबाज इन्नूस शेख यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी विद्या हक्के, अर्जुन सलगर, सुजीत कोकरे, अभिजित झाडपिडे, रणजित भंडारे (सर्व रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आरबाज इन्नूस शेख (वय- २५) यांचे सोलापूर-पुणे हायवेवरील बाळे येथे याराना नावाचे हॉटेल आहे. ३० सप्टेंबरच्या सायंकाळी ६:५५ वाजेच्या सुमारास ‘आम्ही एसीबीचे अधिकारी आहोत, हॉटेल चालू करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अन्यथा वाईट परिणामाला सामोरे जावे लागेल.
हॉटेल बंद पाडण्यात येईल अशी पाचजणांनी मिळून धमकी देऊन खंडणीची मागणी केली. यामध्ये विद्या हक्के या महिलेसोबत आणखी एक महिला व दोन पुरुष होते. त्यांच्याशिवाय अर्जुन सलगर, सुजीत कोकरे, अभिजित झाडपिडे आणि रणजित भंडारे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.