देवेंद्र पाठक, धुळे: पैशांच्या देवाणघेवाणीचा वाद वाढल्याने शिवीगाळ करत दोन गट समोरासमोर भिडले. यातून हाणामारी झाल्याने लाठ्या काठ्यांसह तलवारीचा वापर झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शिरपूर तालुक्यातील एका गावात शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात मध्यरात्री परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने १८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
एका गटाकडून महेंद्र प्रताप पाटील (वय २४) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार पैशांच्या देवाण घेवाणीच्या कारणावरून गावात वाद निर्माण झाला. शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात झाली. एकाने हातातील तलवार उचलून डोक्यात टाकल्याने गंभीर दुखापत झाली. इतरांनी हाताबुक्क्याने मारहाण केली. हे सर्व सुरू असताना आरडा ओरड झाल्याने घरातील मंडळीसह इतरांनी वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यात तीन ते चार जणांनी दुखापत झाली. या गोंधळातच एका महिलेचा विनयभंगही करण्यात आला. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रविवारी मध्यरात्री १० जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.
दुसऱ्या गटाकडून तुषार उर्फ पिंट्या अरुणसिंग राजपूत (वय २२) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पैशांच्या देवाण घेवाणीच्या कारणावरून कुरापत काढून गावात वाद निर्माण झाला. शिवीगाळ करत हाताबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात झाली. लाकडी दांडक्याने डोक्यावर हल्ला करण्यात आल्याने गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी मध्यरात्री २ वाजता ८ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.