भिवंडी : एका खटल्याची सुनावणी सुरू असताना आरोपी व फिर्यादीचे वकील युक्तिवाद करताना त्याचे हाणामारीत पर्यावसान झाल्याची घटना रविवारी दुपारी भिवंडीन्यायालयात घडली. न्यायाधीशांसमोरच दोघे वकील एकमेकांनाच भिडले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वाहिनीच्या पत्रकारालाही वकिलाने मारहाण करीत धमकी दिली. या पत्रकारानेही शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपली बाजू मांडताना ॲड. शैलेश गायकवाड आणि ॲड. अमोल कांबळे यांच्यात भिवंडी न्यायालयातच वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी दोन्ही वकिलांना शांतीनगर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, ॲड. कांबळे यांनी ॲड. गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती पत्रकारांना मिळताच याबाबत वार्तांकन करण्यासाठी ते गेले. गायकवाड हे पोलीस ठाण्यात उभे होते. या घटनेची माहिती पोलिसांकडून एका वृत्तवाहिनीचा पत्रकार घेत असताना या गोष्टीचा राग आल्याने गायकवाड यांनी त्या पत्रकारास शिवीगाळ केली. बातमी दिल्यास पाहून घेईन असे धमकावत मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
न्यायालयात युक्तिवाद करताना दोन वकिलांमध्ये हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 5:51 AM