विरार - विरारच्यारेल्वे स्थानकात चालत्या रेल्वेच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर किकी डान्स करणाऱ्या 3 तरुणांवर आरपीएफने कारवाई केली आहे. स्टंट करणाऱ्या या तिघांना अॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने विरार आरपीएफने अटक केली आणि आज वसई रेल्वे न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयासमोर हे तीन आरोपी ठसाठसा रडू लागले. नंतर न्यायालयाने या त्रिकुटाला दर आठवड्याला तीनवेळा वसई रेल्वे स्थानक साफ करण्याची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे किकी चॅलेंज करणं या त्रिकुटाला अंगलट आलं आहे.
विरार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर किकी डान्स करून 3 तरुणांनी व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये बाजूला एक अॅम्ब्युलन्स दिसत होती. या अॅम्ब्युलन्समधल्या लोकांना या तीन स्टंटबाजांना पाहिलं होतं. त्यावरून आरपीएफने या तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. निशांत राजेंद्र शहा (वय 20), धृव अनिल शहा (वय 20) आणि श्याम राजकुमार शर्मा (वय 24) असे किकी डान्सवर स्टंट करणाऱ्या तिघांची नाव असून हे तिघेही विरार पश्चिमकडे राहणारे आहेत. ते टीव्ही सिरीयलमध्ये काम देखील करतात. मात्र, त्यांना आज वसई रेल्वे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना अनोखी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालायने त्यांना दर आठवड्याला तीनदा वसई रेल्वे स्थानक साफसफाई करण्यास सांगून त्याचा व्हिडिओ बनवून न्यायालयात दाखवायचा आहे. तो व्हिडिओ पाहून न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे. तसेच न्यायालयाने या किकी चॅलेंजबाबत जनजागृतीपर कार्यक्रमात देखील या तिघांचा समावेश करून घ्या. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या दोन वेळेत घेण्यास न्यायालयाने सांगितले आहे.