मुंबई - गुजरात राज्यातील वापीत एका मोबाईल दुकानाचे छत तोडून त्यातील ३५ मोबाईल लंपास करण्याऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने आज मुंबईत कर्नाक बंदर येथे अटक केली आहे. अटक चार आरोपींकडून ३५ मोबाईल्स देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे. ऐजुल लालू शेख उर्फ अर्जुन (वय ४८), तफजूल युनूस शेख उर्फ लड्डू (वय २५), सुजन ससोऊमा रविदास (वय १९) आणि मोटू ऐनूल शेख (वय २८) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीवरून पोलिसांनी कर्नाक बंदर येथे पी. डिमेलो रोडवर हे चार आरोपी ३५ मोबाईल्स विक्री करण्यासाठी आले असताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे ३५ मोबाईल्स आढळून आले. मात्र ते मोबाईल कुठून आणि कश्यासाठी आणले याबाबत ते पोलिसांनी माहिती देत नव्हते . मात्र, सापडलेले ३५ मोबाईल्स चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यांची अधिक चौकशी केली असता १ आणि २ नोव्हेंबरला गुजरातमधील वापी येथील एका मोबाईल दुकानाचे छत रात्री तोडून मोबाईल लंपास केल्याचे चोरट्यांनी काबुल केले. अर्जुन, लड्डू आणि रविदास हे मूळचे झारखंडचे असून मोटू हा पश्चिम बंगालचा आहे. या आरोपींनी डोंगरी, पायधुनी, व्ही. पी. रोड आणि मुंबईतील इतर परिसरात घरफोडीचे गुन्हे तर ठाणे नवी मुंबई, गुजरात राज्यात देखील गुन्हे केलेले आहेत. हे आरोपी सोन्याची आणि मोबाईल दुकानांची रेकी करून त्यांना लक्ष्य करत असत. त्याच परिसरात हे आरोपी भाड्याने रूम घेऊन राहत आणि चोरीचे काम फत्ते करून पलायन करत असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.