उल्हासनगर : पदोन्नती होत नसल्याच्या रागातून सफाई कामगाराने उपायुक्त संतोष दहेरकर यांच्या कार्यालयात पेट्रोल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने खळबळ उडाली असून पदोन्नतीच्या प्रश्न निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपायुक्त देहरकर यांनी दिली.उल्हासनगर महापालिकेत वर्ग 4 मधील कामगारांचे शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान सफाई कामगार दीपक कनोजिया यांनी शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन पदोन्नतीची मागणी केली होती. तसेच विविध पालिका कामगार संघटनेने पदोन्नतीचा प्रश्न लावून धरला. बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान दीपक कनोजिया हा उपायुक्त संतोष देहरकर यांच्या कार्यालयात जाऊन शैक्षणिक पात्रतेवरून पदोन्नती का दिली नाही. अशी विचारणा देहरकर यांना केली. यावेळी देहरकर यांनी नियमानुसार प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. दीपक कनोजिया याने कपड्यात लपून ठेवलेली पेट्रोल बॉटल बाहेर काढून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पेट्रोल पिऊ लागला. त्यावेळी उपायुक्त कार्यालयात बसलेल्या इतरांनी पेट्रोलची बॉटल कनोजिया याच्या कडून काढून घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.सफाई कामगार दीपक कनोजिया याला मध्यवर्ती रुग्णालयात पुढील उपचारा साठी दाखल केले. याप्रकाराने पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून कनोजिया कार्यालयात पेट्रोल घेऊन आलाच कसा? असा प्रश्न सर्वांना पडला. एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. तर पालिकेने वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रश्न टांगतीवर ठेवल्याने ही परिस्थिती ओढविल्याची प्रतिक्रिया कामगार नेते दिलीप थोरात यांनी दिली. आतातरी वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन पदोन्नती प्रक्रिया सुरु करावी. असे थोरात यांचे म्हणणे आहे. यापूर्वी महापालिकेने शैक्षणिक पात्रतेवर थेट वर्ग 3 मध्ये काही कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचे उघड झाले . तर देहरकर यांनी वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती यादी बनवून क्रमवारी व नियमानुसार पदोन्नतीचे काम सुरू असल्याची प्रतिक्रियादिली आहे. महासभेत काही अधिकाऱ्यांना दिली पदोन्नतीसोमवारी झालेल्या पालिका महासभेत नितीन रंगारी व मनीष हिवरे यांना सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीला मान्यता दिली. तर शिवसेनेच्या नागरसेवकांच्या अशासकीय प्रस्तावावरून जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे याना उपायुक्त पदाच्या पदोन्नतीला महासभेने मंजुरी दिली. मात्र असा अशासकीय ठराव आयुक्तांना बंधनकारक नसल्याने भदाणे यांची पदोन्नती वादात सापडण्याची शक्यता आहे.
पदोन्नतीवरून झालेल्या वादातून सफाई कामगाराने पेट्रोल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 7:14 PM