मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सिवनी जिल्ह्यामध्ये एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. तहसीलदार ऑफिसच्या एका क्लार्कवर तब्बल 11 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्याने तब्बल 279 जिवंत लोकांना कागदोपत्री मृत दाखवून हा घोटाळा केला. प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन दहायत या नावाचा क्लार्क अकाऊंट सेक्शनमध्ये काम करतो.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन दहायतने अनेक जिवंत लोकांना कागदावर मृत दाखवलं, यामध्ये अनेक खोट्या नावांचाही समावेश आहे. त्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचं भासवत बनावट आदेश काढून शासनाकडून मंजूर झालेली चार लाख रुपयांची मदत मिळवली. एखादा शेतकरी, भूमिहीन व्यक्ती किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीचा पाण्यात बुडून, सर्पदंश, वीज पडून किंवा अशा इतर कारणांमुळे मृत्यू होतो, तेव्हा सरकारच्या महसूल विभागाकडून आरबीसी 6-4 अंतर्गत या लोकांना 4 लाख रुपयांची मदत मंजूर केली जाते.
ऑडिट झालं असता समोर आला घोटाळा
आरोपी क्लार्कने महसूल विभागाच्या पोर्टलवर पाण्यात बुडून, सर्पदंश, वीज पडून मृत्यू झाल्याची खोटी प्रकरणं अपलोड केली. त्यानंतर मदतीची रक्कम मंजूर झाल्यानंतर एकूण 11 कोटी 16 लाख रुपये बँक खात्यात जमा करून घेतले. अलीकडेच महसूल विभागात ऑडिट झालं असता हा घोटाळा समोर आला. ऑडिटमध्ये अशी 40 बँक खाती दिसली, ज्यात दोन ते तीन वेळा मदतीचे पैसे जमा करण्यात आले होते. 8 बँकांची अशी एकूण 40 खाती होल्ड करण्यात आली आहेत. महसूल विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आदेश पत्रात लेटर पे ते सील आणि सहीपर्यंत सर्व काही बनावट असल्याचं आढळून आलं.
दीड वर्ष सुरू होता घोटाळा
केवलारीचे तहसीलदार हरीश लालवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हा घोटाळा मार्च 2020 ते ऑक्टोबर 2022 दरम्यान करण्यात आला होता. यादरम्यान कोणालाही याबद्दल कल्पना नव्हती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केवलारी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्या क्लार्कला निलंबित केलं असून विभागीय चौकशी सुरू आहे." तहसीलदारांच्या तक्रारीवरून आरोपी क्लार्कविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे. आरोपी लेखनिक फरार असून त्याचा शोध सुरू आहे असं एसपी रामजी श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"