भंडारा : ‘बुक केलेले पार्सल डिलिव्हरी होऊ शकत नाही, ते लॉक झाले आहे. त्यामुळे दिलेल्या लिंकवर क्लिक करून बँक खाते क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांक व सीव्हीसी क्रमांक लिहून पाठवा.’ यातच होत्याचे नव्हते झाले. पार्सल लॉक झाल्याचा बनाव करून बचत खात्यातून तब्बल पाच वेळा मिळून एक लाख पाच हजार रुपयांचे ऑनलाइन पद्धतीने साहित्यांची खरेदी करण्यात आली.
ही घटना आयुध निर्माणी जवाहरनगर येथे राहत असलेल्या शिरिषा राकेश शर्मा यांच्यासोबत घडली. नागरिकांनी कोणत्याही पद्धतीत ऑनलाइन व्यवहार करताना कुठल्याही लिंकवर क्लिक अथवा अनोळखी व्यक्तींना बँक डिटेल्स शेअर करू नये, असे वारंवार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने बजावण्यात येते. मात्र, यंदा फसवणूक करणाऱ्याने वेगळीच शक्कल लावली. डीटीडीसी पार्सल प्राप्त न झाल्याने ऑनलाइन सर्व्हिस नंबर घेऊन फसवणूककर्त्याने शिरिषा शर्मा यांना कॉल केला. यात त्यांचे बुक केलेले पार्सल ‘ऑन दी वे’ असून ते लॉक झाल्याचे सांगितले. तसेच पार्सल अनलॉक करण्याकरिता मोबाइलहून पाठविण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करावे, असे सांगण्यात आले. या लिंकमध्ये बँकेचे बचत खाते क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांक व सीव्हीसी क्रमांक असे भरून सबमिटही करण्यात आले. माहिती सबमिट झाल्यानंतर शर्मा यांना त्यांच्या मोबाइलवर ओटीपी आला. यावेळीही फोन करून त्यांना ओटीपी विचारला. ओटीपी सांगताच शर्मा यांच्या बचत खात्यातून फ्लिपकार्ट व एस बँक यावरून पाच वेळा व्यवहार करण्यात आले. यात त्यांच्या खात्यातून एक लाख पाच हजार रुपयांची खरेदी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिरिषा शर्मा यांनी जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या संदर्भाने गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक देशपांडे करीत आहेत.