नवी मुंबई - ऐरोली येथील सेक्टर - १९ मधील महावीर प्लाझा टॉप या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग ज्या फ्लॅटला लागली, त्या फ्लॅटमधील कुटुंबीय बाहेरगावी गेले असून बंद फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप कळाले नसून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
ऐरोली येथील उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावरील घराला आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. हि आग विजवण्यासाठी वाशीच्या अग्निशमन दलातून लॅडर व्हॅन मागवण्यात आली होती. त्यानंतर उशीरार्पयत आग विजवण्याचे काम सुरु होते. ऐरोली सेक्टर 19 येथील महावीर प्लाझा टॉप या इमारतीमध्ये ही घटना घडली. इमारतीच्या सर्वात वरच्या 22 व्या मजल्यावरील घरात आग लागली. त्यावेळी घरातील व्यक्ती बाहेरगावी गेलेल्या असल्याने घर बंद होते. त्यामुळे आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. मात्र आगीची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु आग उंचीवर असल्याने वाशी अग्निशमन दलातून लॅडर व्हॅन मागवून त्याद्वारे आग विजवण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. यादरम्यान संपुर्ण इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेसाठी बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे कोणीही जखमी झालेले नाही. परंतु लागलेली आग 22 व्या मजल्यावर असल्याने ती आटोक्यात आणण्याच्या कामात अडथळा निर्माण होत होता. तर सदर इमारतीमधील अग्निशमन यंत्रणाही निकामी असल्याचे समजते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत आग विजवण्याचे काम सुरु होते.