लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अटक टाळण्यासाठी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांंना २५ लाख रुपयांची लाच दिली आहे. तशीच मागणी माझ्याकडेही करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी यश ठाकूर ऊर्फ अरविंदकुमार श्रीवास्तव याने केला आहे. याबाबात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चार तक्रारी त्याने केल्या आहेत.
ठाकूर याच्या तक्रारी अधिक तपासासाठी मुंबई पोलिसांकडे पाठविल्याची माहिती एसीबीने दिली आहे. याबाबत मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. यश ठाकूर हा अमेरिका स्थित फ्लिझ मूव्हीज कंपनीचा मालक आहे. या कंपनीअंतर्गत मॉडेल्स, अभिनेत्रींकडून मालिका, वेबसिरीजच्या नावाखाली करार बनवून घेण्यात येत होते. कुंद्रा याच्या कंपनीद्वारे जे पोर्न चित्रपट तयार व्हायचे ते ठाकूरच्या कंपनीद्वारे वेबसाइटवर अपलोड करण्यात येत असल्याचा आरोप आहे. कंपनीचे पहिले नाव न्यूफ्लिक्स होते. गुन्हे शाखेने आतापर्यंत ठाकूरच्या बँक खात्यातील साडेचार कोटी रुपये गोठविले आहेत.
याप्रकरणात फेब्रुवारीमध्ये सुरतमधून अटक केलेल्या तन्वीर हाश्मीच्या चौकशीतून ठाकूरचे नाव समोर आले. हाश्मीने ठाकूरसाठी पोर्न चित्रपट तयार करत असल्याचे सांगितले होते. गहना वशिष्ठने देखील गेल्या दोन वर्षांपासून ती ठाकूरच्या संपर्कात आहे. मात्र, त्यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट झाली नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. यात ठाकूर याचे पोर्न चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील मढसह लोणावळा आणि सुरतमध्ये भाड्याने बंगले घेत सुरू होते, अशीही माहिती आहे. ठाकूर हा नेहमी ऑनलाइन व्यवहार करत होता.
गुन्हे शाखा त्याच्याही व्यवहाराची माहिती घेत आहे.
पुढे, कुंद्रा यांनी लाच दिल्याचा दावा आणि ठाकूरकडे केलेल्या मागणीत अस्पष्टता आढळून आल्याने एसीबीने याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारीचे मेल ३० एप्रिल रोजी मुंबई पोलिसांकडे पाठवल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. यश ठाकूरविरोधात २०२०मध्ये मध्यप्रदेशच्या माधवगंज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा देखील गुन्हा नोंद आहे.
भाड्याने घेतलेले बंगले रडारवर येण्याची शक्यता
मार्च महिन्यात ठाकूरकडून एसीबीला तक्रारींचे ४ ई-मेल आले. यात केलेल्या आरोपात, कुंद्रा याने अटक टाळण्यासाठी गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांंना २५ लाख रुपये दिले. तसेच माझ्याकडूनही अटक न करण्यासाठी तशीच मागणी केल्याचा दावा केला गेला आहे.