अलिबाग : ॲग्रीमेंट फॉर जॉब वर्कच्या काँट्रॅक्ट फाईलसाठी पाच लाख रुपये व एज्युडिकेशनच्या पूर्ण केलेल्या दोन फाईल व पेंडिंग एक फाईल अशा तीन फाईलची अंतिम मागणी नोटीस देण्याकरिता मागितलेल्या ५ लाख ३० हजार लाचेप्रकरणी रायगडचे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र अर्जुन साटम (५२) यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाने ३० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. साटम याच्या कार्यालयातील टेबलाची झडती घेऊन ५ लाख ६३ हजार ५०० रुपये रक्कमही हस्तगत केली आहे. नवी मुंबई लाचलुचपत पथकाने ६ जून रोजी रात्री १० वाजता ही कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्हा निबंधक कार्यालयातील आर्थिक भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
तक्रारदार यांच्या, जिल्हा निबंधक कार्यालयात जॉब वर्क कॉन्ट्रॅक्टबाबत आणि एज्युडिकेशनच्या तीन फाईल पेंडिंग होत्या. याबाबत तक्रारदार हे कार्यालयात फेऱ्या मारीत होते. मात्र त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. कार्यालयातील पेंडिंग फाईलबाबत अंतिम नोटीस देण्यासाठी सहजिल्हा निबंधक शैलेंद्र साटम यांनी तक्रारदार याच्याकडे ३० हजार, तर जॉब वर्क कॉन्ट्रॅक्टसाठी ५ लाखांची लाचेची मागणी ६ जून रोजी केली होती. तक्रारदार आणि साटम यांच्यात बोलणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे लाचेप्रकरणी तक्रार दाखल केली.
नवी मुंबई लाचलुचपत पथकाने सापळा रचला. ६ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अलिबागसह जिल्हा निबंधक कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून एज्युडिकेशनच्या फाईलीबाबत ३० हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. साटम याच्या कार्यालयाची झडती घेतली असता टेबलामध्ये ५ लाख ६३ हजार ५०० रुपये रक्कम हस्तगत केली. साटम यांना अटक करण्यात आली.