पुणे - शहरात घडणारे गंभीर गुन्हे व आगामी निवडणुकांचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडल पाचमधील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग आॅपरेशन राबविले. त्या वेळी पोलिसांना रेकॉर्डवरील १५५ गुन्हेगार मिळून आले. तर तडीपारीच्या काळात शहरात आलेले व कोयते बाळगणारे, पिस्तूल बाळगणारे व पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी मिळून आले, अशी माहिती परिमंडल पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.परिमंडल पाचअंतर्गत येणाऱ्या वानवडी, मुंढवा, हडपसर, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या देखरेखीखाली कोम्बिंग आॅपरेशन राबविले. हे कोम्बिंग आॅपरेशन मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान त्यानंतर बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राबविले. त्या वेळी या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शस्त्रांचा वापर करून गुन्हे करणारे गुन्हेगार, जबरी चोरी, चोरी, घरफोडी करणारे, तडीपार, पाहिजे असलेले, फरार, व दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेले आरोपी यांचा शोध घेतला.दोन गुन्हे दाखलपोलिसांनी त्यावेळी अभिलेखावरील एकूण ४७९ आरोपी तपासण्यात आले. तर त्यापैकी १५५ आरोपी मिळून आले. शुभम पवार, शेखर चन्नापा शिंगे, शिवराज माने यांच्याकडे कोयते आढळून आले़ संदीप करुल (वय २८, रा़ कोंढवा) आणि आकाश ठाकुर (वय २५, रा़ मुंढवा) यांना तडीपार केलेले असतानाही ते पुणे शहरात आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ घरफोडीच्या गुन्ह्यातील व़ॉन्टेड असलेला तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २७) याला अटक करण्यात आली.हे कॉम्बिंग आॅपरेशन अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड व दोनसहायक पोलीस आयुक्त, ४३ अधिकारी, १५५ कर्मचारी यांच्या पथकाने केली.
कोम्बिंग आॅपरेशनमध्ये तडीपारांसह सराईत मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 1:39 AM