मुंबई - अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ३ तस्करांना अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) अटक केली अाहे. या तस्करांकडून कोकेन, हेराॅईन अादी लाखो रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.
अंधेरीत बीएमसीच्या 'के' वार्ड येथे एक नायझेरियन तस्कर १२ लाख रुपयांच्या कोकेनची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी जाॅन कॅनेडी (वय ३६) हा नायझेरियन संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून अाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ १२५ ग्रॅम कोकेन आढळून आले. जाॅन हा सध्या नवी मुंबईमध्ये राहत अाहे. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींचाही पोलिसांनी शोध लावला. त्यानुसार शुक्रवारी एएनसीच्या घाटकोपर युनिटने घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथून मानझार दी मोहद शेख (वय ४३) याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याजवळून ८ लाख ९० हजार रुपयांचे हेराॅईन हस्तगत केले. शेख हा गोवंडी परिसरात राहणारा आहे. त्यानंतर सोमवारी पुन्हा एएनसीच्या पोलिसांनी एलबीएस मार्गावर सापळा रचला होता. त्या ठिकाणी अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या इरफान यासीन शेख (वय ३६) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून २ किलो पिसीड्योफेड्रीन अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.