लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आदिसअबाबा येथून मुंबईत आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून १४९६ ग्रॅम कोकेन केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी हस्तगत केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १५ कोटी रुपये इतकी आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली असून हे कोकेन स्वीकारण्यासाठी नवी मुंबईतील वाशी येथे आलेल्या एका परदेशी महिलेलाही अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिसअबाबा येथून मुंबईत येणाऱ्या एका प्रवाशाकडे मोठ्या प्रमाणावर कोकेनचा साठा असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. ज्यावेळी ही व्यक्ती विमानतळावर दाखल झाली त्यावेळी त्याला बाजूला घेत त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली. त्या सामानात त्याने कोकेन दडविले असल्याचे आढळून आले. या नंतर या व्यक्तीची चौकशी केली असता हे पार्सल वाशी येथे एका परदेशी महिलेला देण्यासाठी आणले असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत वाशी येथून या परदेशी महिलेलाही अटक केली.