ठळक मुद्देसक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले असून चौकशीसाठी बोलविले होते. ही समन्स रद्द करण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
बेंगळुरु : कर्नाटककाँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांच्यावरच संकट ओढावले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले असून चौकशीसाठी बोलविले होते. आज त्यांना अटक करण्यात आली आहे. डी. के. शिवकुमार यांना 2018 मध्ये ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी ईडीने काढलेली नोटीस रद्द करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयायात धाव घेत अर्ज दाखल होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना आज ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, याविषयी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी मागील दोन वर्षात माझ्या आईच्या नावे असणारी संपत्ती वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी बेनामी असल्याचे सांगत जप्त केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आज ईडीने शिवकुमार यांना अटक केली आहे. ईडीच्या कचाट्यात सापड़लेले पी चिदंबरम यांच्यानंतर शिवकुमार दुसरे मोठे नेते आहेत. शिवकुमार यांनीच कर्नाटक सत्तांतरावेळी नाराज आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना मुंबईतून माघारी परतावे लागले होते. 2017 मध्ये डी. के शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्लीतील निवासस्थानांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. या छाप्यात 8 कोटी 59 लाखांची बेकायदा रक्कम आढळून आली होती. याप्रकरणातील चौकशीदरम्यान डी. के शिवकुमार यांनी खोटी माहिती दिली, असा आरोप करून ईडीने त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याचबरोबर, डी. के शिवकुमार यांनी हलावा एजंटमार्फत कोट्यवधी रुपये बदलून घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी समन्स बजावले होते. ही समन्स रद्द करण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मी भाजपमधील हितचिंतकांचे अभिनंदन करतो. त्यांचे मला अटक करण्याचे मनसुबे सफल झाले. आयकर विभाग आणि ईडीची प्रकरणे माझ्याविरोधात राजकीय हेतूने रचली गेली. मी भाजपाच्या सूडाच्या राजकारणाचा बळी ठरलो, असे ट्विट शिवकुमार यांनी अटकेच्या आधी केले आहे.