मुंबई : कॉमेडियन अग्रिमा जोशुआ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सामाजिक माध्यमांवर त्यांना टार्गेट केल्याचे दिसून आले. त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर करत धमकी देणाऱ्या उमेश दादा उर्फ इम्पतियाज शेख याला नालासोपारा येथून सोमवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात यापूर्वी शेखचा साथीदार शुभम मिश्राला गुजरात पोलिसांनीअटक केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रिमा जोशुआ यांनी गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी क़ाय वक्तव्य केले? याबाबत तज्ञांची मदत घेत योग्य ती कारवाई करण्यात येईल. मात्र कुठल्याही महिलेविरुद्ध अशा पद्धतीने आक्षेपार्ह वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यानुसार मुंबईपोलिसांनी शेखला अटक केली असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे. शेखने उमेश दादा या नावाने इंस्टाग्रामवर जोशुआविरुद्ध आक्षेपार्ह विधान करत त्यांच्या फ़ॉलोअर्सनाही तसेच करायला सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुंबई पोलिसांना ट्वीट केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानुसार मुंबई पोलिसांनी त्याच्या नालासोपारा येथील घरी धाव घेतली. तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेडया ठोकल्या. यात एकूण तीन जणांचा समावेश असल्याची माहिती समजते. पोलीस शेखकडे चौकशी करत आहे. त्यातून आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.