भोपाळ - धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन मुनव्वर फारुकीला कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने फारुकीची जामीन याचिका बुधवारी फेटाळली. बंधुता व सद्भावना प्रबळ करणे हे प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. एका कार्यक्रमादरम्यान या विनोदी कलाकाराने हिंदू देवतांचा अपमान करत धार्मिक भावनांची खिल्ली उडविल्याचा आरोप आहे.कॉमेडियन फारुकी आणि त्याच्या चार साथीदारांना इंदूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरोधात भाजपा खासदार मालिनी गौर यांचा मुलगा एकलव्य गौर यांनी तक्रार दाखल केली होती. फारुकीने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी इंदूर टीआय कमलेश शर्मा यांनी म्हटले आहे की, 'हिंदू देवतांचा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अपमान केल्याचा पुरावा त्यांच्यावर सापडलेला नाही.'
फारुकीच्या वकिलांनी दाखल केलेल्या दोन याचिका यापूर्वी फेटाळण्यात आल्या आहेत. राज्याच्या उच्च न्यायालयात ही तिसरी याचिका होती. २५ जानेवारी रोजी न्यायमूर्ती रोहित आर्य म्हणाले, 'परंतु तुम्ही दुसर्याच्या धार्मिक भावनांचा चुकीचा फायदा का घेत आहात? आपल्या विचारात काय चुकले आहे, आपण व्यवसायासाठी हे कसे करू शकता?, त्याच वेळी तक्रारदार गौर यांनी फारुकीच्या अटकेनंतर म्हटले आहे की, "तो हिंदूंचा देवतांवर अनेकदा विनोद करणारा गुन्हेगार आहे." गौर म्हणाले, 'जेव्हा मी मुनव्वरच्या शोविषयी ऐकले तेव्हा मी तिकीट विकत घेतले आणि बघायला गेलो. अपेक्षेप्रमाणे ते हिंदू देवतांचा अपमान करीत होते आणि त्याच वेळी गोध्रा दंगलीशी गृहमंत्री अमित शहा यांचे नाव जोडून थट्टा करत होते.
तत्पूर्वी, फारुकीची जामीन याचिका मध्य प्रदेशातील कोर्टाने 5 जानेवारी रोजी फेटाळली होती. त्याचदरम्यान 14 जानेवारी रोजी फारुकी जामिनासाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. येथील खटल्याची सुनावणी दुसर्या दिवसापर्यंत तहकूब करण्यात आली. इथेसुद्धा विनोदी कलाकाराची याचिका फेटाळून लावली. तसेच त्याची न्यायालयीन कोठडी 27 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली.