जळगाव - काम झाले आहे, आता घरी जेवायला येतोच, असा फोन करताच मत्स व्यवसाय विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार जगन्नाथ धडील (५५, रा.नाशिक) व कनिष्ठ लिपिक रणजीत हरी नाईक (४९, रा.रायसोनी नगर, जळगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी दीड वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट परिसरातील कार्यालयात झाली.
तक्रारदार यांचा मत्स्य व्यवसाय असून त्यांनी वाघुर धरणावर पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनाचे कंत्राट घेतलेले आहे. या मत्स्यपालन व्यवसायाला मिळणारे सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्त धडील यांची भेट घेतली.धडील यांनी दहा हजाराची मागणी करुन कागदपत्रांची पुर्तता व उत्कृष्ट अहवाल सादर करण्यासाठी वरिष्ठ लिपीक नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले होते. त्यानंतर तक्रारदाराने मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. ठाकूर यांनी पडताळणी केल्यानंतर बुधवारी दुपारी रक्कम देण्याचे निश्चित झाले.
असा रचला सापळातक्रारीची पडताळणी झाल्याने उपअधीक्षक ठाकूर यांनी तक्रारदार यांनी मत्स व्यवसाय विभागाच्या कार्यालयात पाठविले. पैसे स्विकारल्यानंतर तेथूनच माझे काम झाले आहे, घरी जेवणाला येतो असा सांकेतिक शब्द ठरला होता. स्वत: सहाय्यक आयुक्त धडील यांनी दहा हजार रुपये स्विकारताच तक्रारदाराने ठाकूर यांना फोन करुन सांकेतिक शब्दात संवाद साधला. त्यानंतर ठाकूर, निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, हवालदार सुरेश पाटील,मनोज जोशी, प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, व ईश्वर धनगर यांनी धडील व नाईक या दोघांना पकडले. दोघांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.