मुंबई : इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून उडी घेत ३६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी नागपाडा येथे घडली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी महिलेचे नाव सांगण्यास नकार दिला. मृत महिला ही मूळची मीरा रोड येथील रहिवासी असून, गेल्या सहा वर्षांपासून तणावात होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. लग्नाच्या ७ वर्षांनंतर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर ती आईवडिलांकडे राहायला आली होती. मात्र, नुकतेच तिच्या आईवडिलांचेही निधन झाल्याने ती तणावात होती. तिचा तणाव लक्षात घेऊन काका तिला स्वत:च्या घरी घेऊन गेले. सध्या नागपाडा येथील ऑर्चिड एनक्लेवमध्ये ती काकांच्या घरी राहात होती.
मात्र, ती सतत तणावात असायची, असे तिच्या घरच्यांनी सांगितले. याच तणावातून शुक्रवारीदेखील तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, हे लक्षात आल्याने कुटुंबीयांनी तिला अडविले. त्यानंतर, शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून उडी घेत तिने आत्महत्या केली. घटनेची वर्दी मिळताच नागपाडा पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली.