मुंबई - फोर्ट येथे 63 लाख रुपयांचा अपहार करून एका खासगी कंपनीची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेषत: ही रक्कम लंपास करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून कंपनीचा अकाऊंटंट आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध बोगस दस्तऐवजच्याआधारे अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या या अकाऊंटचा पोलीस शोध घेत आहेत.
सत्येन अजीतकुमार बोरा हे प्रभादेवी येथील आप्पासाहेब मराठे मार्गावरील चैतन्य टॉवरमध्ये राहतात. सध्या ते मेसर्च गांधी अॅण्ड कंपनीत कामाला असून कंपनीचे कार्यालय फोर्ट येथील एन. एस. रोडवरील भागोदय अपार्टमेंटमध्ये आहे. याच कंपनीत 40 वर्षांचा आरोपी अकाऊंटंट म्हणून कामाला आहे. एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2018 या कालावधीत आरोपीने कंपनीसह साक्षीदारांच्या नावाने बनविलेल्या बेअरर धनादेशावर सह्या घेतल्या होत्या. त्यानंतर धनादेशच्या मागील बाजूस बोगस सह्या करून वेळोवेळी कंपनीच्या बँक खात्यातून 63 लाख 50 हजार रुपयांचा अपहार केला होता. हा प्रकार अलीकडेच सत्येन बोरा यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना ही माहिती दिली होती. त्यानंतर कंपनीच्या वतीने सत्येन बोरा यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार दाखल केली.