वसमत (हिंगोली ) : वीज वितरण कंपनीत बनावट व परस्पर विद्युत जनित्र बसवून पैसे कमवण्याचे रॅकेट कार्यरत आहे. वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे येथे पाच डीपी परस्पर बसविण्यात आल्याची तक्रार देणारा वीज वितरणचा अभियंताच या प्रकरणात आरोपी झाला आहे. त्याची रवानगी कारागृहात झाली आहे. यापूर्वी एक लाईनमनही गजाआड झाला होता. त्यास निलंबित करण्यात आले आहे.
वसमत तालुक्यात वीज वितरण कंपनीत काही ठेकेदार व वीज वितरणचे अधिकारी यांनी वीज वितरणालाच चुना लावण्याचा प्रकार सुरू केला आहे. बनावट व विनामंजरीची कामे करून लाखो रुपये कमवण्याचा सपाटा लागलेला आहे. वीज वितरणची कामे करून अल्पावधीत मालामाल होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे गावात वीज वितरणची कोणतीच परवानगी नसताना परस्पर पाच डी.पी. बसवण्यात आल्याचा महाभयंकर प्रकार समोर आला होता.
या प्रकरणाचा बोभाटा झाल्यावर वीज वितरण कंपनीच्या ग्रामीणच्या शाखा अभियंता शंकर आडबे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. शाखा अभियंत्याने पोलिसांत दिलेली तक्रार फक्त स्वत:ला व वीज वितरणमधील झारीतील शुक्राचार्यांना सुरक्षित करण्यासाठीच होती, हे स्पष्ट होते. डीपी बसवून वीजपुरवठा सुरू करून दोन महिने झाले तरी त्याची खबर नव्हती. पोलिसांच्या चौकशीत अखेर फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
ग्रामीण पोलिसांनी तपासात निष्पन्न झाल्याने शाखा अभियंता शंकर आडबे यास ताब्यात घेवून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली. फिर्यादीच आरोपी झाल्याने वीज वितरण कंपनीत बोगस डी.पी. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यापूर्वी लाईनमला अटक करण्यात आली होती. सदर लाईनमनला निलंबित करण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता कादरी यांनी दिली.
फिर्यादी अभियंत्याचा डीपी बसवण्याच्या कामात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंदखडके यांनी दिली. दरम्यान, बोगस डीपी प्रकणातील डीपी कोठून आणले? कसे आले? असे अजून किती गावात डीपी बसवलेले आहेत? याची चौकधी होण्याची गरज आहे. वसमत तालुक्यात काही तथाकथित ठेकेदार वीज वितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढून बोगस कामे करत असल्याचे समोर येत आहे.
व्याप्ती मोठी : चौकशीची गरजतालुक्यात ग्रामीण भागात बसवलेल्या डीपीपैकी किती डीपी मंजूर आहेत. कितीची टेस्टिंग झालेली आहे. त्यांची बिले आहेत का, याचीच जरी चौकशी झाली तरी अजून किती जणांवर कारवाई होईल, हे सांगणेही अवघड आहे. एवढी मोठी या घोटाळाची व्याप्ती आहे. एजन्सीमधील स्पर्धेतूनच पिंपळा चौरे प्रकरणात तक्रारीत एजन्सीच्या नावाचा उल्लेख आहे अजून त्या एजन्सीवाल्यावर कार्यवाही झालेली नाही. डी.पी जेथून आलेले आहेत तेथील जबाबदार व्यक्तींवर कारवाई नाही. इतरही गावात बसवलेल्या डी.पी.ची चौकशीही नाही.
... तर गोत्यातया प्रकरणात सखोल चौकशी झाल्यास एजन्सींसह अनेक अधिकारी, कर्मचारी गोत्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीने स्वतंत्र तपास पथकाची स्थापना करण्याची गरज आहे.