लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कथित बलात्कार प्रकरणातील आरोपीविरोधात केलेली तक्रार पुढे नेण्याची इच्छा नसल्याचे म्हणणाऱ्या पीडितेला व तिच्या आईविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश विशेष पॉक्सो न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले. संबंधित आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार व तिच्या आईने सहकार्य न केल्याने खटल्यात तथ्य राहिले नाही. प्रकरणाचा मणकाच तुटला. आरोपीचे दोषत्व सिद्ध करणारे पुरावेच रेकॉर्डवर नाहीत. या पॉक्सोच्या प्रकरणात तक्रारदार व तिची आई सरकारी वकिलांच्या महत्त्वाच्या साक्षीदार होत्या, असे दिंडोशी सत्र न्यायालयाचे विशेष न्या. एच. सी. शेंडे यांनी म्हटले.सतरा वर्षीय राज्यस्तरीय थ्रोबॉल खेळाडू आरोपीला जानेवारी २०१९ मध्ये भेटली. मुंबईत ती काही ठिकाणी सराव करायची. एक दिवस आरोपीने तिला त्याच्या घरी बोलावले आणि तिला प्रपोज केले. त्याच महिन्यात त्यांचे एकमेकांशी शारीरिक संबंध आले.
तक्रारीनुसार, संबंधित मुलीची मार्च २०१९ मध्ये मासिक पाळी चुकली आणि त्याचवेळी तिला कावीळही झाली. सुरुवातीला तिला वाटले की ती आजारी आहे म्हणून तिला मासिक पाळी आली नाही. तिने जूनपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर ती २४ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. त्यांनतर मुलीने व तिच्या आईने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार केली, दुसरीकडे आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप फेटाळला. दोघांमधील गैरसमजुतीमुळे आपल्याला नाहक या प्रकरणात गोवले आहे. आपले एकमेकांवर प्रेम होते आणि आम्ही एकमेकांशी विवाह केला आणि आमच्या मुलीबरोबर आनंदाने राहात असल्याचे सांगितले.
न्यायालयाने काय म्हटले?घटनेच्यावेळी आरोपी अल्पवयीन होती, हे सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही. तसेच तक्रारदारने स्वतः म्हटले आहे की, ती सांताक्रूझ पोलीस ठाण्यामध्ये गेली नाही आणि तक्रारही केली नाही. आम्ही १० ऑक्टोबर २०१९ मध्ये विवाह केला आणि मुलीबरोबर राहात आहोत. आपल्याला आरोपीविरोधात कोणतीही तक्रार नाही व त्याविरोधात केस चालविण्याची इच्छा नाही. त्यानंतर मुलीच्या आईनेही सरकारी वकिलांना दिलेला पाठिंबा मागे घेतला. त्यावर न्यायालयाने मायलेकींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले.