लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेने पोलीस ठाण्यातच राडा करून महिला पोलिसांना मारहाण करून पळ काढल्याची घटना घडली. यादरम्यान ती पोलीस ठाण्यातल्या वस्तूंची तोडफोड करत असताना तिला विजेचा धक्काही बसला. त्यानंतरही तिने स्वतःला आवर न घालता पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत पोलिसांना चकमा देऊन पतीसह पळ काढला.
रबाळे पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री हा प्रकार घडला. त्याठिकाणी नावेद खान (३५) ही व्यक्ती एका प्रकरणाची तक्रार देण्यासाठी आली होती. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात त्याची पत्नी संगीता खान ही ४ वर्षाच्या मुलीला घेऊन उभी होती. दरम्यान त्यांची तक्रार सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील घेत होत्या. त्याचवेळी बाहेर उभ्या असलेल्या संगीता खान हिने आरडा ओरडा करत पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांनी तिची समजूत काढून, तुमची तक्रार घेत आहोत असे सांगण्याचा प्रयत्नही केला. परंतु तिने स्वतःचे कपडे फाडून घेत स्वतःकडील मुलीला जमिनीवर फेकत पोलीस ठाण्यातच राडा करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय महिला सहायक निरीक्षक किरण पाटील यांच्यासह पोलीस शिपाई नीलम पवार व इतरांना शिवीगाळ व मारहाण करत पोलीस ठाण्यातल्या वस्तूची तोडफोड सुरु केली. त्यामध्ये विद्युत वायर देखील खेचल्या गेल्याने तिच्यासह सहायक निरीक्षक पाटील यांनाही विजेचा धक्का बसला. यामुळे इतर महिला कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करून तिला ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांसोबत केलेल्या कृत्याबाबत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय चाचणीसाठी नेले जात असतानाच तिने पतीसह दुचाकीरून पळ काढला.