लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध क्षेत्रातील मुस्लीम महिलांचे बदनामीकारक फोटो संकेतस्थळावर आणि ॲपवर अपलोड करण्याचा प्रकार उघड झाला आहे. शिवसेना खा. प्रियंका चतुर्वेदी यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, तर राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाचा सखोल पाठपुरावा सुरू असून, लवकरच तपास पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या मुलींना बदनाम करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी मी पाठपुरावा करणार असल्याचे मलिक यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले. प्रकरणामध्ये मुंबईतील काही मुलीदेखील पीडित आहेत. मुलींबद्दल वादग्रस्त मजकूर लिहून त्यांचे फोटो शेअर करणे हा मोठा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी सरकारच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे मुलींचे फोटो चुकीच्या पद्धतीने शेअर केले होते. केंद्राचे समर्थक अशी काही पोर्टल चालवत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. दोषींवर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र पोलीस कारवाई करतील, असे मलिक म्हणाले.
महिलांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखलवेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाइन ॲपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्लीतील एका महिलेने अशाप्रकारे प्रसिद्ध केलेले फ़ोटो ट्विटरवर शेअर केले. त्यानंतर, हा प्रकार समोर आला असून या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. हाच मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरत, मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.