महाड : महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्याकडे प्रतिमहिना दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार मुंबईतील एका वाहतूक व्यावसायिकाने केली आहे. ही खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे आमदारपुत्र तथा दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी धमकाविल्याची तक्रार मुंबईतील मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात व्यावसायिकाने केली आहे. या प्रकरणी विकास गोगावले यांच्याविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये उभे असलेले या व्यावसायिकाचे दोन कंटेनर फोडून चालकांकडील रोख रक्कम आणि मोबाइल लंपास करण्यात आले. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दहा ते बारा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.
भांडुप येथील राजेश शेटकर यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. शेटकर यांची राजेश कार्गो अँड मुव्हर्स प्रा. लि. ही वाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे कंटेनर न्हावा शेवा ते महाड एमआयडीसी अशी वाहतूक करतात. काही दिवसांपूर्वी महाडचे आमदार भरत गोगावले यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले. मात्र, शेटकर भेटण्यासाठी गेले नाहीत. मंगळवारी विकास गोगावले यांनी त्यांना फोन करून दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. शेटकर भेटायला गेल्यानंतर निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे दरमहा मला दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी विकास यांनी केली. राजेशनी असमर्थता दर्शविल्यानंतर, विकास यांनी धमकी देत कंटेनर फोडून टाकू असा इशाराही दिला. त्यानंतर शेटकर हे हॉटेलमधून बाहेर पडताच, महाड एमआयडीसीत त्यांच्या दोन कंटेनरची तोडफोड केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर शेटकर यांनी मरिन ड्राइव्ह पोलीसांत याबाबत तक्रार केली. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी विकास गोगावलेविरुद्ध धमकावण्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारणी भरत गोगावले यांची बाजू समजून घेण्यासाठी फोन केला, मात्र तो स्वीच ऑफ होता.
१० ते १२ जणांवर गुन्हामहाडमध्ये, बुधवारी रात्री ११.४०च्या सुमारास शेटकर यांच्या राजेश कार्गो ट्रान्सपोर्टचे एमएच ४६, ३२४१ आणि एमएच ४६एआर-३४६३ हे दोन कंटेनर महाड एमआयडीसीतील अॅक्वा फार्मा या कंपनीतून रसायन घेऊन न्हावा शेवा बंदराकडे जात असताना दहा ते बारा जणांनी बिरवाडी टाकीकोंड येथे कंटेनर थांबवून त्यांच्यावर हल्ला केला. दोन्ही कंटेनरच्या काचा फोडल्या. यापैकी एक कंटेनरचा चालक सूर्यनाथ चौधरीला मारहाण करण्यात आली आणि दुसरा कंटेनरचालक सुभाषचंद्र जयस्वाल याच्या खिशातील साडेचार हजार रुपयांची रोख रक्कम आणि अडीच हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. या प्रकरणी सुभाषचंद्रने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला असला तरी गोगावले यांच्या इशाऱ्यामुळेच कंटेनरची तोडफोड केल्याचा आरोप राजेश शेटकर यांनी केल आहे.