खा. पुत्र पंकज तडस यांच्याविरोधात महिला काँग्रेसचे एसपींना दिले निवेदन; कारवाईची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 03:08 PM2021-09-08T15:08:49+5:302021-09-08T15:20:00+5:30
Wardha News : महिला काँग्रेसने नोंदविला खासदार पुत्राचा निषेध; एसपींना निवेदन देऊन केली कठोर कारवाईची मागणी
वर्धा : भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पूत्र पंकज तडस यांनी पत्नीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडे पीडितेने तक्रार दाखल केली आहे. खासदार पूत्राचा हा प्रकार निंदनिय असून त्याचा महिला काँग्रेसच्यावतीने निषेध करीत पंकज तडस याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
खासदार पूत्राकडून करण्यात आलेले कृत्य हे अशोभनिय तसेच निंदनिय असून त्याचा महिला काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला. महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांच्या नेतृत्त्वात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी केल्यावर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात आशा भुजाडे, अरुणा धोटे, सोनाली कोपुलवार, अर्चना कश्यप, सपना परियाल, जयश्री कटारे, निमा फुलबांधे, शालिनी हर्डीकर, शैला दीक्षित यांच्यासह महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ताई मला वाचवा...
खासदार पूत्र पंकज याच्या पत्नीने चक्क राकाँच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याशी एक चित्रफित शेअर करून 'ताई मला वाचवा... माझ्या जीवाला धोका आहे' अशी विनवणी केली आहे. चाकणकर यांनी ही चित्रफित ट्विटरवरून शेअर केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले. तसेच आज सकाळच्या सुमारास सदर महिलेच्या घराजवळ पोलिसांच्या मोठा बंदोबस्त होता.