-हितेंन नाईक
पालघर:- मुंबईत रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर ह्या प्रकरणात एनसीबीने साक्षीदार बनवीलेल्या किरण गोसावी विरोधात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणाची स्थानिक तरुणांची तक्रार केळवे सागरी पोलीस ठाण्यात दोन वर्षांपासून पडून आहे.ह्या प्रकरणात येत्या दिवसात पोलीस ठाण्यात गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने एनसीबी अधिकाऱ्याच्या समोरील अडचणीत वाढ होऊ शकते.
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या विरुद्ध केलेल्या कारवाई दरम्यान आर्यन खान ह्याचा हात पकडून एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा इसम हा किरण गोसावी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे एनसीबी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत असून कोणत्या अधिकाराने गोसावी आर्यनचा हात पकडून नेत असल्याचा खुलासा एनसीबी ने करावा अशी मागणी ही मलिक ह्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ह्या प्रकरणात ज्या किरण गोसावी ला एनसीबीने मुख्य साक्षीदार म्हणून पुढे केले आहे तो गोसावी एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आता पुढे येत असून पालघर जिल्ह्यातील एडवन गावातील उत्कर्ष तरे व आदर्श किणी ह्या दोन तरुणांकडून दीड लाखाची रक्कम घेऊन परदेशात नोकरी लावून देतो असे सांगितले.ह्या दोन्ही तरुणांनी नवी मुंबई येथील केपी इंटरप्रायजेस, ह्या गोसावीच्या कंपनी खात्यात दीड लाख रक्कम जमा केली.
विमान तिकीट आणि व्हिसा पाठविण्यात आले असता कोचीन विमानतळावर हे तिकीट व व्हिसा बोगस असल्याची बाब आमच्या समोर आल्याचे ह्या तरुणांनी पत्रकारांना सांगितले.ह्या प्रकरणी आम्ही केळवे पोलीस ठाण्यात धाव घेत आमची फसवणूक झाल्याची तक्रार तरुणांनी सप्टेंबर 2019 रोजी दिली आहे.ह्याला पोलिसांनी ही दुजोरा दिला आहे. मात्र दोन वर्षात ह्या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी स्वारस्य दाखविलेले नाही.किरण गोसावीचा फोटो आर्यन प्रकरणात प्रसारमाध्यमावर दिसू लागल्यानंतर तरुणांनी गोसावी शी 5-6 ऑक्टोबर पर्यंत संपर्क साधून आपले पैसे परत देण्याची मागणी केली. ह्या तरुणांनी आपले पैसे परत मिळावे ह्यासाठी सततच्या तगाद्या मुळे मी तुमच्या विरोधात मुंबईत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करीन अशी धमकी त्यांनी स्थानिक तरुणांना दिल्याची माहिती ही समोर आली आहे.