लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (जि. वाशीम) : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी तपास सुरू असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप नेत्या चित्रा वाघ, अतुल भातखळकर, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड यांच्याविरुद्ध बंजारा समाजाची बदनामी केल्याची तक्रार मानोरा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम सरदार राठोड (रा. गुंडी) यांनी सोमवारी ही तक्रार देत या सर्व नेत्यांविरुध्द कारवाईची मागणी केली. पोलिसांनी याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे मानोरा पोलिसांनी सांगितले.
तक्रारीत राठोड यांनी नमूद केले की, पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली, ही बाब खेदाची असून त्याचे आम्हालाही दु:ख आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासह हे भाजप नेते बंजारा समाजाची, पूजा चव्हाणच्या कुटुंबाची बदनामी करून चारित्र्यहनन करीत आहेत. तसेच, पोलीस तपासात अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे संबंधित नेते व मीडियावर कारवाई करावी; अन्यथा राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे आंदोलन करू, असा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे. सदर तक्रार प्राप्त झाली आहे. मानोरा पोलिसांनी ती तपासात ठेवली असून, वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे. मानोराचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले.
प्रकरण दाबण्यासाठी दिलेत ५ कोटी रुपयेपुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल केला जातो; मात्र, मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली आहे.
n प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, असा दावा त्यांनी केला. शांताबाई राठोड यांनी सोमवारी (दि. १) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राठोड म्हणाल्या, पूजाचे आणि माझे चांगले नाते होते. तिला न्याय मिळणार नाही, तोवर लढा सुरू राहील. पाच कोटी रुपये दिल्याचा पुरावा योग्यवेळी नावासह देणार आहे. n परळीतील सीसीटीव्ही मिळावे यासाठी अर्ज दिला आहे. अरुण राठोड हा माझ्या चुलतभावाचा मुलगा आहे. पूजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.