मुंबई – क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) अटक केल्यापासून हे प्रकरण देशभरात चांगलंच गाजत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी या घटनेतील NCB तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोपांच्या फैरी सुरु केल्याने छापेमारीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. मलिक विरुद्ध वानखेडे असं शाब्दिक युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
नवाब मलिकांनीसमीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी लाटल्याचा आरोप केला आहे. यात मलिकांनी समीर वानखेडेच्या पहिल्या लग्नाचे फोटो, निकाहनामा आणि समीरचं बर्थ सर्टिफिकेट जारी करत वानखेडे कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. तर समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांच्यावरही वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मलिकांनी वानखेडे कुटुंबावर थेट हल्ला करत त्यांच्याविरोधात मोहिम सुरू केली आहे.
आता समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे(Yasmin Wankhede) यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. तसेच मलिकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका महिलेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची मागणी यास्मिननं पत्र लिहून राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. एक नोकरदार माणसाच्या जन्म प्रमाणपत्राबाबत शोध घेणारे नवाब मलिक कोण आहेत? त्यांची रिसर्च टीम दुबईपासून मुंबईपर्यंत आमचे फोटो पोस्ट करत आहेत. आम्हाला जीवे मारण्याची धमकी येत आहे असा आरोप यास्मिननं केला आहे.
यास्मिननं ओशिवरा पोलीस ठाण्यात नवाब मलिकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. मलिकांनी खोटे आरोप करत आमची बदनामी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नवाब मलिकांनी सातत्याने वानखेडे कुटुंबावर हल्ला केल्यानंतर आता वानखेडे कुटुंबही समोर आलं आहे. नवाब मलिकांकडे कागदपत्रे असतील तर त्यांनी कोर्टात जावं मीडियासमोर येऊन वेळ का वाया घालवत आहेत. आम्ही मलिकांच्या प्रत्येक आरोपाला कोर्टात उत्तर देऊ असं यास्मिननं म्हटलं आहे.
मलिकांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचं सांगत त्यांनी दलिताचा हक्क हिसकावल्याचा आरोप केला आहे. जर मी दिलेले पुरावे खोटे असतील तर मी राजीनामा देण्यास तयार आहे असं चॅलेंजही मलिकांनी दिली आहे. आता मलिकांविरोधात वानखेडे कुटुंब कायदेशीर लढाई लढण्यास तयार झालं आहे. त्यामुळे आगामी काही काळात वानखेडेविरुद्ध मलिक यांच्यातील वाद आणखी वाढत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.