नवी मुंबई : पतीचे त्याच्या बहिणीसोबतचे अनैतिक संबंध पकडल्याने आपल्यावर सातत्याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून छळ झाल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला आहे. याप्रकरणी तिचा पती, नणंद व सासूविरोधात बुधवारी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पाच महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेल्या विवाहितेला पुन्हा माहेरची वाट धरावी लागली आहे. पाच महिन्यांपूर्वीच तिचा प्रेमविवाह झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी पती व नणंदेला घरात आक्षेपार्ह अवस्थेत बघितले असल्याचा तिचा आरोप आहे.
या कृत्याचा धक्का बसल्याने तिने फोटो काढून पतीला त्याचा जाब विचारला होता. त्यामुळे पती व पोलिस दलात असलेली नणंद यांनी आपल्याला अमानुष मारहाण केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. शिवाय पती सातत्याने इच्छेविरोधात अनैसर्गिक अत्याचार करून त्रास देत असल्याचाही तिचा आरोप आहे.
नणंद सतत माहेरी नवी मुंबई पोलिस दलात असलेली नणंद विवाहित असून, सासरच्यांसोबत भांडण करून सतत माहेरी असते. ती सासूला काहीही सांगून आपला छळ करत होती, अशीही तक्रार विवाहितेने केली आहे. विवाहितेचा छळ, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.