सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिलेली तक्रारदार महिला पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. रेणू शर्मा असं या महिलेचं नाव असून ती डी.एन. नगर पोलीस ठाण्यात जबाब दाखल करण्यासाठी पोहोचली आहे. डी.एन. नगर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या देखरेखीखाली जबाब नोंदवला जाणार आहे. आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती ही महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना देणार आहे. याआधी रेणू शर्मा हीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पावणे बाराच्या सुमारास तरुणीने डी एन नगर पोलीस ठाण्यातील एसीपी कार्यालयात धाव घेतली.
रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे पहिल्यांदा कधी भेटले; आरोप करणारी 'ती' महिला कोण?, जाणून घ्या
भाजप नेते किरीट सोमय्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात, धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेची घेणार भेट आहेत. संबंधित पोलिसांशीही चर्चा करणार असून मुंडेंच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणारी महिला सध्या डीएन नगर विभाग सहायक आयुक्त (एसीपी) यांच्या समोर आपला जबाब नोंदवित आहे.
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज रेणू शर्मा या महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी लोकमतला सांगितले. तक्रारदार महिला ही मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीची लहान बहीण आहे. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती उघड केली होती. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे.