जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलिसांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अनेकांवर गुन्हे दाखल झाले असून यापुढे लाचेचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी बुधवारी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना दिला. त्याचबरोबर जनतेशी आपुलकीने वागा, त्यांना वेळ द्या, त्यांचे म्हणणे समजून घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.
पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात जिल्ह्यातील पोलीस अधिकाºयांची दिघावकर यांनी बैठक घेतली. दुपारी १२.३० वाजता सुरु झालेली बैठक २.३० वाजता संपली. ५१ मिनिटाच्या भाषणात दिघावकर यांनी अधिकारी व कर्मचाºयांना कर्तव्याची जाणीव करुन देताना गुन्हेगारांवर वचक कसा ठेवावा, याच्या काही टीप्स दिल्या. प्रत्येक कर्मचाºयाने आपण स्वत: अधिकारी आहोत, या पध्दतीने काम करावे. किती कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात हे त्यांनी प्रभारी अधिकाºयांना विचारले. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्याला गुजरात तर जळगाव जिल्ह्यात मध्य प्रदेश लागून आहे, त्यामुळे या जिल्ह्यातून अमली पदार्थाची तस्करी होते, ती यापुढे होऊ नये, शंभर टक्के हे धंदे बंद झाले पाहिजे, तसे झाले तर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिघावकरांनी दिला. पंजाबमध्ये दारुमुळे किती बळी गेले व तेथे पोलीस अधीक्षकापासून अनेक अधिकाºयांवर कारवाई झाली याचीही त्यांनी आठवण करुन दिली.
मोबाईल क्रमांक केला जाहीरदिघावकर यांनी जनतेसोबतच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसाठी आपला स्वत:चा मोबाईल क्रमांक ९७७३१४९९९९ जाहीर केला. पोलिसांनी कोणतेही वैयक्तिक किंवा शासकीय काम असले तर केव्हाही फोन करा. भेटायचे असेल तर केव्हाही भेटता येईल, त्यासाठी वेळ घेण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचार व कौटुंबिक छळाच्या तक्रारींसाठी पोलीस दलात वेगवेगळे सेल स्थापन केलेले आहेत. त्याशिवाय महिला दक्षता समित्याही नव्याने गठीत करण्याचे आदेश पाचही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व सचिन गोरे उपस्थित होते.