म्हापसा : एका रहस्यमय गुन्ह्याची उकल करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले. हळदोणा मतदारसंघातील किटला या गावात गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला झालेल्या एका सत्तावीस वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी २४ तासांत संशयित आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात संशयिताने मृत युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता.म्हापसा पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी संशयित आरोप मुकेश विनायक देवेकर (रा. लाजोर, किटला-हळदोणा) असे नाव आहे. तर अविनाश यशवंत साखळकर (२७, रा. किटला-हळदोणा) असे मयताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २१) रात्री ७.२० ते ९.४५ दरम्यान घडली.शुक्रवारी रात्री उशिरा तक्रारदार मयताच्या आईने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता तिथे त्यांना डोक्यावर गंभीर दुखापत झालेला एक मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई व पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपथकांची नियुक्ती केली. तसेच पोलिसांकडून तपासाच्या दृष्टिकोनातून अनेक लोकांची चौकशी केली व मिळालेल्या माहितीच्या आधारे २४ तासांच्या आत या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यास आम्हाला यश मिळाल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.याप्रकरणी मुकेश देवेकर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता संशयिताने खून केल्याचे सांगितले. संशयित आरोपी हा मासेमारीसाठी गेला होता. त्याठिकाणी मयताने अगोदर संशयितासोबत किरकोळ कारणावरून भांडण उकरून काढले असता त्याचे पर्यावसन मारामारीत झाले व रागाच्या भरात संशयिताने मयताच्या डोक्यावर दगड घालून त्याचा खून केला. घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचरण केले होते. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, असेही सक्सेना यांनी सांगितले.दरम्यान, या तपास कामात पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना, पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई व पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर, उपनिरीक्षक आशिष परोब, अनिल पोळेकर, सुनील पाटील तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, आल्विटो डिमेलो, इर्षाद वाटंगी, रिकी फर्नांडिस, कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर, फ्रँकी वाझ, सर्वेश मांद्रेकर, लक्ष्मीकांत नाईक, अभिषेक कासार, विजय नाईक, प्रकाश पोळेकर, सुरज शेट्ये, रामा लाड, गगन गावकर यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर हे तपास करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?