लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका कॉम्प्युटर कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या तरुणाला कथित विदेशी महिलेसोबत फेसबुक फ्रेंडशिप करणे चांगलेच महागात पडले. तिने गिफ्ट पाठविल्याचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने दोन लाख पाच हजार रुपये हडपले.
संकल्प महेश पटले (वय ३२) असे या प्रकरणातील फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.
संकल्प एका काम्प्युटर कंपनीत सेल्स मॅनेजर आहे. त्याला १० एप्रिल २०२० ला वेणीसा स्कॉड नामक महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती एक्सेप्ट केल्यानंतर कथित वेणीसा संकल्पसोबत सलग ऑनलाइन संपर्क करू लागली. त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर वेणीसाने संकल्पचा मोबाइल नंबर मिळवला आणि त्याला गिफ्ट पाठवीत असल्याची थाप मारली. हे कथित गिफ्ट एअरपोर्टवर अडवून धरले गेले. त्यासाठी कस्टम ड्युटी भरणे बंधनकारक आहे, असे कथित कस्टम ऑफिसर सुमित राणा याने संकल्पला फोन करून सांगितले. त्यानंतर आरोपी वेणीसा, सुमित राणा यांनी समीर गुहा, श्रद्धा मिश्रा आणि सुमन शहा यांच्या नावे असलेले वेगवेगळे बँक अकाउंट नंबर देऊन संकल्पला दोन लाख पाच हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले. रक्कम भरल्यानंतर पुन्हा काही ना काही कारण सांगून आरोपी त्याला नव्याने बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत होते. वारंवार हा प्रकार होत असल्यामुळे संकल्पला संशय आला. त्याने आणखी रक्कम जमा करण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संकल्पने पोलिसांकडे धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून सोमवारी कपिल नगर पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
तपास सायबर सेलकडे
यापूर्वी असे अनेक गुन्हे घडले आहेत. दिल्ली, नोएडात बसून नायजेरियन टोळी असले गुन्हे करतात. लोकमतने त्यांच्या गुन्ह्याची वेगवेगळी पद्धत दर्शविणारी एक वृत्तमालिका यापूर्वी प्रकाशित करून नागरिकांना सतर्क करण्याचाही प्रयत्न केला आहे, हे विशेष! या प्रकरणाचा तपास सायबर शाखेकडे सोपविण्यात आला असून, आरोपींची चौकशी केली जात आहे.