लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काटकसर करून भविष्यासाठी बँकेत रक्कम भरायला गेलेल्या एका महिलेचे ११ हजार रुपये एका भामट्याने लंपास केले. सोमवारी सकाळी ११ वाजता दिघोरीच्या सेंट्रल बँक शाखेत ही घटना घडली.इंदू सुरेश चव्हाण (वय ३०) या पवनपुत्रनगर दिघोरी येथे राहतात. त्या गृहिणी असून, त्यांचा पती मिस्त्री (गवंडी) काम करतो. काटकसर करून चव्हाण दाम्पत्याने ३० हजार रुपये जमविले. ही रक्कम बँकेत जमा करण्यासाठी इंदू सोमवारी सकाळी ११ वाजता सेंट्रल बँकेत पोहचल्या. तत्पूर्वी त्यांनी आपल्या मुलाला शाळेत सोडले. बँकेत कॅश काऊंटरजवळ त्या उभ्या असताना एक भामटा त्यांच्याजवळ आला. तुमच्या नोटांना रंग लागला आहे. मी काढून देतो, असे म्हणत त्याने ३० हजारांमधील ११ हजार रुपयांच्या नोटा बेमालूमपणे काढून घेतल्या आणि उर्वरित १९ हजार रुपये इंदू यांच्या हातात दिले. त्यांच्या पावतीवर ३० हजार रुपयांची नोंद होती, तर प्रत्यक्षात १९ हजार रुपयेच रोखपालाच्या हातात असल्याने त्याने ती बाब इंदू यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्या भामट्याने ती रक्कम लांबविल्याचे स्पष्ट झाले. इंदू यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक अंबुरे यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.
नागपुरात बँकेतून भामट्याने लांबविली रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:44 AM