मडगाव: मोलकरणीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेला नौदल अधिकारी मनीकंदन नांबियार (44) याला आज गुरुवारी गोव्यातील दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. न्यायाधीश सायनोरा लाड यांच्या न्यायालयाने नंबियार 20 हजार रुपये तसेच दोन दिवस सकाळी नऊ ते सांयकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजेरी लावणे व तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजेरी लावणे या अटीवर सशर्त जामीन अर्ज मंजूर केला. साक्षीदारावर दबाव आणू नये अशीही अट घालण्यात आली आहे.गोवा नौदल विभागात नौदलाचा वरिष्ठ अधिकारी असलेला नांबियार याच्या विरुद्ध त्याच्या घरी मोलकरणी म्हणून कामाला असलेल्या एका महिलेने पोलिसांत तक्रार केली होती. त्यात संशयिताने आपला विनयंभ केल्याचे नमूद करण्यात आले होते. भारतीय दंड संहितेच्या 354 , 354 (अ), 354 (ब) कलमाखाली वास्को पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी मनीकंदन नांबियार याची चौकशी सुरु केली असता अचानक त्याची प्रकृती बिघाडल्याने त्याला इस्पितळात दाखल करावे लागले होते.संशयित हा नौदल अधिकारी आहे. तसेच पीडित महिला ही विधवा असून, तिला दोन मुलेही आहे. संशयित तिच्यावर दबाव टाकू शकत असल्याने त्याला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये अशी मागणी पोलिसांतर्फे या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना न्यायालयात केली होती. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील व्ही.जे. कॉस्ता तर संशयितार्फे वकील दिलेश्वर नाईक यांनी बाजू मांडली.
मोलकरणीचा विनयभंगप्रकरणी नौदल अधिका-याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:27 PM