काँग्रेस नेत्यावर खंडणीचा गुन्हा; नगरसेवकाकडे मागितले होते 50 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:46 PM2019-05-30T17:46:15+5:302019-05-30T17:49:32+5:30
कुमार काकडे असे खंडणी दाखल झालेल्या काँग्रेस नेत्याचे नाव
नालासोपारा - नगरसेवकाने अनधिकृत बांधलेल्या इमारतीची माहिती अधिकारात मागवून अपिलात जाणार किंवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या काँग्रेस नेत्यावर वसई पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमानव्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पण पुन्हा एकदा वसई तालुक्यात माहितीच्या अधिकाराचा दुरुउपयोग करून बांधकाम व्यवसायिकांकडून कसे उकळले जातात हे पुन्हा एकदा उघड झाले असून राजकीय पक्षाचे नेतेमंडळीमध्ये खळबळ माजली आहे. कुमार काकडे असे खंडणी दाखल झालेल्या काँग्रेस नेत्याचे नाव असून या फरार नेत्याला पोलीस कधी पकडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरसेवक अरुण जाधव यांनी बांधलेल्या इमारतीच्या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात 2016 साली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जामिनावर खुला झाल्यानंतर कुमार काकडे याने अपिलात जाऊन दुसऱ्या बांधकामाची कागदपत्रे मिळाली असून ती दाखवून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने अब्रू जाईल या भीतीने नावाची खराबी होऊ नये म्हणून कुमार नाईक यांच्या मध्यस्थीने सप्टेंबर 2016 साली शेवटच्या आठवड्यात भुईगाव येथील जाप आळीमधील स्वामी गुरुदत्तच्या आश्रमातील मठात 10 लाख रुपये रोख स्वीकारले. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2016 साली संध्याकाळी साडे सातच्या सुमारास सदर मठात अरुण जाधव कडून काकडे याने 20 लाख रुपये घेतले होते. उर्वरित 20 लाख रुपये मार्केट मध्ये मंदी असल्या कारणाने दिवाळीनंतर देतो असे सांगण्यात आले होते. पण कुमार काकडे हा पूर्ण पैश्यांचा व्यवहार झाल्यानंतर पलटू नये व परत दुसऱ्या कोणत्या कारणावरून दम देऊ नये याकरिता 27 ऑक्टोबरला मठात कुमार काकडेला पैसे देत असताना व्हिडीओ आणि व्हाईस रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. उर्वरित 20 लाख रुपये अरुण जाधव काकडेला देऊ न शकल्याने वारंवार न्यायालायत अपिलमध्ये जाण्याची व पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होता.
2016 साली वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बविआच्या पक्षातर्फे अरुण जाधव यांनी नगरसेवकासाठी उमेदवार उभे राहिल्यावर कुमार काकडे यानेही उमेदवारी अर्ज भरून उभा राहिला होता पण या निवडणुकीत कुमार काकडे याचा पराभव झाला होता. हाच राग मनात असल्याने काकडे यांनी अरुण यांच्या वडिलांच्या कार्यकाळात बांधलेल्या इमारतीची माहिती माहिती अधिकारात मिळवून महानगरपालिकेत, पोलीस ठाण्यात आणि न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला असल्याचेही कळते.
कुमार काकडे याने 30 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याने वसई पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दिली आहे. कुमार काकडे याने इतका पैसा, जमिनी, गाड्या कुठून कमवले ? किती बिल्डरांकडून माहिती मागवून लाखो रुपये घेतले याची चौकशी करणे खूप गरजेचे आहे. या प्रकरणाची खोलवर तपासणी केली तर अनेक प्रकरणे उघड होतील. - शेखर जाधव (तक्रारदार)